अंध व्यक्ती मतदान कसं करतात? ईव्हीएमवरचं बटण कोण दाबतं?

Blind Voter Vote: अंध व्यक्ती आपलं मत कसं नोंदवतात? तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Updated: May 17, 2024, 06:04 PM IST
अंध व्यक्ती मतदान कसं करतात? ईव्हीएमवरचं बटण कोण दाबतं? title=
Blind Voters Vote

Blind Voter Vote: सध्या देशात निवडणुकीचे वारे घोंगावतायत. देशात 7 टप्प्यात मतदान होत असून यातील 4 टप्पे पूर्ण झाले आहेत. अजून 3 टप्पे बाकी आहेत. या मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. यावेळची मतदानाची टक्केवारी कमी होताना दिसत असली तरी मतदानाबद्दल प्रत्येक उत्सुकता असते. मतदान आपला अधिकार आहे. आपण आपला नेता निवडतो. त्यामुळे मत द्यायला हवे. यासाठी सरकारदेखील प्रोत्साहन देत असते. आपण ईव्हीएम मशिनवरील बटण पाहून मत देतो. पण अंध व्यक्ती आपलं मत कसं नोंदवतात? तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

दृष्टी असलेल्यांना ईव्हीएम मशिन, त्यावरील उमेदवाराचे निशाण आणि त्यासमोरील बटण पाहून मत देता येते. पण दृष्टीहिनांना हे सोयीस्कर नसते. पण निवडणूक आयोगाने दृष्टीहिन बांधवांची मतदान करण्याची योग्य व्यवस्था केली आहे. 

मतदान केंद्रावर नियमाचे पालन 

दृष्टीहिन मतदारांना आपला हक्क बजावता यावा, मत देता यावे यासाठी निवडणूक आयोगाने नियम बनवला आहे. या नियमाचे प्रत्येक मतदान केंद्रावर पालन केले जाते. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना अगोदरच माहिती दिली जाते. 

ईव्हीएम मशिनच्या ठिकाणी जाण्याची परवानगी 

दृष्टीहिन व्यक्ती मतदान केंद्रावर येत असेल तर त्याच्यासोबत एका व्यक्तीला आत जाऊ दिले जाते. दृष्टीहिन मतदारासोबत त्यांच्या कुटुंबातील किंवा गावातील एका सदस्याला ईव्हीएम मशिनच्या ठिकाणी जाण्याची परवानगी असते. 

मग आता दृष्टीहिन मतदारासोबत असलेली व्यक्ती त्या व्यक्तीच्या वतीने मतदान करते का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही योग्य आहात. कारण दृष्टीहिन व्यक्तीला बटण ओळखणे कठीण असते. अशावेळी आपल्याला कोणाला मत द्यायचे आहे ते ती सोबतची व्यक्तीला सांगते. त्यानंतर दृष्टीहिन मतदाराच्या उपस्थितीत ती व्यक्ती त्याच्या वतीने मतदान करते. 

काहीवेळा दृष्टीहिन मतदाराचे बोट घेऊनही त्याला हव्या असलेल्या व्यक्तीला मत दिले जाते. दरम्यान ही सर्व प्रक्रिया निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडते. 

मतदानाबाबत कोणते नियम? 

दृष्टीहिन बांधवांसोबत मतदान करण्यास कोणती व्यक्ती जाऊ शकते? यासाठी देखील निवडणूक आयोगाने नियम आखून दिले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. सोबत असलेल्या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. एक व्यक्ती एका दृष्टीहिन व्यक्तीसोबत एकदाच मतदान द्यायला जाऊ शकतो. तीच व्यक्ती परत दुसऱ्या दृष्टीहिन व्यक्तीसोबत जाऊ शकत नाही. 

मला स्वत:ला माझ्या हातून मत द्यायचे आहे, असे कोणी दृष्टीहिन व्यक्ती म्हणत असेल तर त्याला तसे करण्याची परवानगी आहे. अशावेळी  निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली हे मतदान पार पडते.