स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

Swati Maliwal Vibhav Kumar news: आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलीसांनी कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे. 

राजीव कासले | Updated: May 18, 2024, 02:43 PM IST
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक title=

Vibhav Kumar Arrest : आम आमदी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना मारहाण केल्याच्या आरोपात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे पीए विभव कुमार (Vibhav Kumar) यांना अटक करण्यात आली आहे.13 मे रोजी स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री निवासस्थानी विभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. स्वाती मालीवाल यांनी तक्रार केल्यानंतर केजरीवाल यांच्या घरातून पोलिसांनी विभव कुमार यांना आधी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अटक केली. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीमुसार विभव कुमार यांना तीस हजारी कोर्टासमोर सादर केलं जाईल, तिथे त्यांची पोलीस कस्टडी मागितली जाल. विभव कुमार यांच्यासाठी अॅडव्होकेट करण शर्मा बाजू मांडणार आहेत.

आधी चौकशी, नंतर अटक
दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना चौकशीसाठी आधी ताब्यात घेतलं. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना अटक केली. याआधी विभव कुमार यांनी दिल्ली पोलिसांना ईमेल करत तपासात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. आपल्याला मीडियातून एफआयआर करण्यात आल्याचं कळलं, आतापर्यंत मला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, माझ्या तक्रारीवर दिल्ली पोलिसांनी लक्ष घालावं असंही विभव कुमार यांनी म्हटलं आहे. 

आणखी एक व्हिडिओ समोर
खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या नव्या व्हिडिओत एक महिला पोलीस कर्मचारी स्वाती मालीवाल यांच्या हाताला पकडून त्यांना बाहेर घेऊन जाताना दिसत आहे. मुख्यमंत्री निवासस्थानातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जातंय.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
13 मे रोजी स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. यानंतर विभव कुमार यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करत तपासाला सुरुवात केली. मॅजेस्ट्रीटच्या समोर स्वाती मालीवाल यांचा जबाब नोंदवण्यात आला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन संजय सिंह यांनी विभय कुमार यांच्याकडून स्वाती मालीवाल यांच्याबरोबर अयोग्य वर्तन केल्याचा कबुल केलं. विभव कुमार यांनी स्वाती मालिवाल यांना मारहाण केली असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचं संजय सिंह यांनी सांगितलं. विभव कुमार यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असंही संजय सिंह यांनी सांगितलं.

यानंतर आपच्या नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी स्वाती मालीवाल लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाला बदनाम करत असल्याचा आरोप केला. स्वाती मालीवाल यांना भाजप भडकावत असल्याचा आरोपही आपने केला आहे. भाजपने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजप नेते आणि प्रवक्त्यांनी विभव कुमार प्रकरणात केजरीवाल यांनी मौन पाळल्याचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने केजरीवाल यांचा निषेध करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.