T20 World Cup: दबाव असल्याने हार्दिक पांड्याची निवड? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं, 'IPL मध्ये...'

Jay Shah on Hardik Pandya Selection in T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टी-20 संघात घेण्यास फार उत्सुक नव्हते असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 17, 2024, 01:33 PM IST
T20 World Cup: दबाव असल्याने हार्दिक पांड्याची निवड? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं, 'IPL मध्ये...' title=

Jay Shah on Hardik Pandya Selection in T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा झाली तेव्हा फॉर्ममध्ये नसणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) स्थान दिल्याने अनेकांच्या भुवा उंचावल्या होत्या. तसंच शुभमन गिल (Shubhman Gill) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) यांचा विचार न करण्यात आल्यानेही आश्चर्य व्यक्त झालं होतं. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी जास्त पर्याय उपलब्ध नसल्याने हार्दिक पांड्याची निवड करण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. यादरम्यान एका रिपोर्टमध्ये निवड समितीवर दबाव असल्याने हार्दिक पांड्याला संघात घेतल्याचा दावा करण्यात आला होता. यादरम्यान आता बीबीसीआयचे सचिव जय शाह (BCCI secretary Jay Shah) यांनी वर्ल्डकप संघ निवडीवर भाष्य केलं आहे. फक्त आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड केली जाऊ शकत नाही असं जय शाह म्हणाले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जय शाह यांनी खेळाडूंची निवड करताना त्यांच्या परदेशातील अनुभवाची दखलही घ्यावी लागते असं सांगितलं आहे. तुम्ही जेव्हा टी-20 वर्ल्डकपसारख्या स्पर्धेसाठी संघ निवडता तेव्हा विदेशात खेळण्याचा अनुभव किती आहे हेदेखील पाहावं लागतं असं त्यांनी सांगितलं. 

"फॉर्म आणि अनुभव यांचाय योग्या समतोल साधावा लागतो. फक्त आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड केली जाऊ शकत नाहीत. विदेशात खेळण्याचा अनुभवही महत्त्वाचा असतो," असं जय शाह म्हणाले आहेत.

दैनिक जागरणने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात, कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकरचा हार्दिक पांड्याच्या निवडीला विरोध होता. 15 सदस्यांच्या संघात हार्दिकला स्थान देण्यात ते फार उत्सुक नव्हते असा दावा केला होता. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, हार्दिक पांड्याची टी-20 वर्ल्डकपमध्ये निवड करण्यासाठी दबाव होता. मात्र यावेळी त्यांनी हा दबाव परिस्थितीनुसार म्हणजे तो अष्टपैलू खेळाडू असल्याने की एखाद्या व्यक्तीकडून आहे हे स्पष्ट केलं नव्हतं. अहमदाबादमधील निवड बैठकीदरम्यान कर्णधार रोहित शर्मा, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि काही निवडकांनी टी-20 विश्वचषक संघात पांड्याच्या निवडीला विरोध केल्याचे सूत्रांनी सांगितल्याचा दावा होता.

भारतीय संघाकडे सध्या हार्दिकप्रमाणे वेगवान गोलंदाजी करु शकणारा अष्टपैलू खेळाडू नाही. हार्दिकसाठी शिवम दुबे हा एकमेव पर्याय आहे. पण त्याच्यातील कौशल्य हार्दिकच्या जवळपास जाणारं नाही. दरम्यान कर्णधार रोहित टी-20 विश्वचषकात आपली प्लेइंग इलेव्हन कशी निवडतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.