'माझ्या चित्रपटांची नावं घेऊन त्यांनी...', अलका कुबल यांनी सांगितला 'बाजीराव मस्तानी'च्या ऑडिशनवेळचा भन्साळींसोबतचा किस्सा

Alka Kubal on Bajirao Mastani Auditioned : अलका कुबल यांनी 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या एका भूमिकेसाठी दिलं होतं ऑडिशन... संजय लीला भन्साळींसोबतच्या भेटीचा सांगितला किस्सा

दिक्षा पाटील | Updated: May 18, 2024, 11:56 AM IST
'माझ्या चित्रपटांची नावं घेऊन त्यांनी...', अलका कुबल यांनी सांगितला 'बाजीराव मस्तानी'च्या ऑडिशनवेळचा भन्साळींसोबतचा किस्सा title=
(Photo Credit : Social Media)

Alka Kubal on Bajirao Mastani Auditioned : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ज्या त्यांच्या सोज्वळ चेहऱ्यासाठी ओळखल्या जातात त्या म्हणजे अलका कुबळ. अलका कुबळ यांनी आजवर अनेक दर्जेदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यापैकी सगळ्यांच्या लक्षात असलेला त्यांचा चित्रपट हा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण तुम्हाला माहितीये का संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अलका कुबळ यांचा लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटाची ऑफर दिली होती. संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबळ यांना बाजीराव मस्तानीमधील एका भूमिकेसाठी ऑफर दिली होती. अलका यांनी त्यासाठी ऑडिशन देखील दिलं मात्र, त्याचं पुढे काही होऊ शकलं नाही. याविषयी अलका कुबळ यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाती एका भूमिकेची ऑफर अलका कुबळ यांना केली होती. याविषयी स्वत: अलका कुबळ यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. या मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याच्या संधीविषयी सांगितलं आहे. यावेळी अलका कुबळ यांना प्रश्न विचारण्यात आला की 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या वेळी संजय लीला भन्साळी यांनी तुम्हाला एक भूमिका ऑफर केली होती. मात्र, नेमकं काय जुळून आलं नाही?' त्यावर उत्तर देत अलका कुबळ म्हणाल्या, "त्यावेळी मी कलर्स मराठीवरच्या एका मालिकेचं शूटिंग करत होते आणि तेही बाहेरगावी. त्यामुळे सतत दौरे सुरु होते आणि त्याच वेळी (संजय लीला भन्साळी) यांच्या प्रोडक्शनमधून मला फोन येत होते की, प्लीज तुम्ही या लवकर. पण, मी त्यांना म्हटलं की मी याच अमूक अमूक तारखेला मुंबई येणार आहे. कारण मी शूट कॅन्सल करुन येऊ शकत नाही. खरं तर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे माझे आवडते. मुळात ते किंवा मणिरत्नम हे कोणाला आवडत नसतील. तर, तेव्हा मला खूप आनंद झाला की, मला एवढे कॉल येतायेत तर नक्कीच माझं काम होणार."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : तब्बल 25 दिवसानंतर घरी परतला तारक मेहता मधील 'रोशन सोढी', इतके दिवस कुठे होता गुरुचरण सिंग?

पुढे त्या अलका कुबळ म्हणाल्या की "मुंबईत आल्यावर मी त्यांना भेटायला गेले. मला वाटलं नव्हतं की ते मला एवढा वेळ देतील. माझं ऑडिशन्स झालं पण माझा चेहरा एवढा सिंपल आणि सोबर होता की संजय लीला भन्साळी म्हणाले मला म्हणाले, 'अलकाजी, आपका फेस इतना सोबर हैं. पर, ये लूक थोडा ऐसे चाहिए इसलिए मैं आपको इसमें कास्ट नहीं कर सकता.' पण, त्यांना आता मला परत अशा भूमिकेसाठी बोलवावं याची प्रतिक्षा करते. त्यात मला एका गोष्टींचं फार कौतुक वाटतंय ते म्हणजे त्या माणसानं (संजय लीला भन्साळी) माझे अनेक चित्रपट पाहिले होते. भेटल्यावर त्यांनी मला माझ्या चित्रपटांची नावं घेऊन सांगितलं, या गोष्टीचं मला खूप नवलं वाटलं."